भिडेवाडा म्हटलं म्हणजे आठवण येते ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची, स्त्री शिक्षणाची सुरुवात जिथून झाली ते ठिकाण म्हणजे भिडेवाडा. याबद्दल आपण या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेऊया. महिलांना उंबरठ्याबाहेर पडण्याची परवानगी नसताना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी रुढीवादी परंपरांना छेद देऊन महिलांना सक्षम करण्यासाठी स्त्री शिक्षणाची सुरुवात करण्याचे ठरवले. त्यावेळी सावित्रीबाई फुले या फक्त १७ वर्षाच्या होत्या, तर महात्मा ज्योतिबा फुले हे २१ वर्षाचे होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी उचललेल्या या पावलामुळे महाराष्ट्राच्या भवितव्याची दिशाच बदलली होती. महात्मा फुले यांनी सुरू केलेली शाळा कशी होती त्यावेळेस ची परिस्थिती कशी होती आणि भिडेवाडा नेमका कुणाचा होता. हेच या लेखातून जाणून घेऊया.
ज्यांचा वाडा होता ते तात्याराव भिडे नेमके कोण होते.तात्याराव भिडेंच्या वाड्यात महात्मा फुलेंची शाळा सुरु झाली असा उल्लेख आढळून येतो. पण हे भिडे नेमके कोण होते यांच्याबद्दल जाणून घेऊया.या वाड्याचे मालक म्हणजे शंकर रामचंद्र भिडे. कुलवृत्तांतमध्ये त्यांच्याबाबत माहिती मिळते. त्यानुसार हे भिडे पेशाने सावकार होते. पेशवाई बुडाली त्यानंतर राजश्रय मिळवण्यासाठी ते पटवर्धनांकडे गेले आणि तिथे कामाला लागले. त्यांना दोन पत्नी होत्या. त्यापैकी पहिली पत्नी आणि तिची मुले पुण्यात राहायची. शंकरराव भिडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन्ही पत्नीच्या मुलांमध्ये प्रॉपर्टी वरून वाद झाला. ते प्रकरण कोर्टात गेलं. त्या केस संदर्भातील कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यात त्या भिडे कुटुंबाबद्दल माहिती मिळते. शंकरराव भिडे दत्तक होते अशीही माहिती मिळते. तात्यासाहेब भिडे हे उदारमतवादी होते. महात्मा फुले यांचे ते स्नेही होते. त्यांच्या प्रशस्त वाड्यात ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलं राहत असत. फुल्यांनी भिड्यांना मुलींची शाळा सुरु करण्याबाबत सांगितल्यावर त्यांना ती संकल्पना आवडली आणि त्यासाठी त्यांनी जागा तर दिलीच पण त्याशिवाय सुरुवातीचा खर्च १०१ रुपयाची देणगी ही त्यांनी दिली .
सावित्रीबाईचे शिक्षण :
शाळा सुरू करण्यापूर्वी सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण पूर्ण करण्यात आले. सुरुवातीला त्यांना ज्योतिराव फुले यांनी शिकवल्याच्या नोंदी आढळतात. सुरुवातीचे शिक्षण झाल्यानंतर महात्मा फुले यांनी आपल्याच दोन सहकाऱ्यांना म्हणजे गोवंडे आणि भवाळकर यांना सावित्रीबाई फुलेंना पुढचे शिक्षण देण्याची जबाबदारी दिली. नितीन पवार सांगतात सावित्रीबाईनी १८४७ मध्ये नॉर्मली स्कूलची चौथी परीक्षा पास झाल्याची नोंद सापडते. त्यानंतर मुलींना शिकवण्यासाठी त्यांनीच पुढाकार घ्यावा असा आग्रह ज्योतिरावांनी धरला. सावित्रीबाईंनी नॉर्मल स्कूलमधून शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण केला अशी नोंद आहे. कै. शास्त्री नारोबा बाजी महाघट पाटील यांच्या आत्मचरित्रात सापडते. या प्रक्रियेतूनच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ ला भिडे वाड्यात शाळा सुरू केली. आणि आता १ जानेवारी २०२४ ला १७५ वर्षे पूर्ण झाले. आला जाणून घेऊया. फुलेंच्या नोंदीनुसार त्यांनी अहमदनगर येथील कन्या शाळा पाहिली आणि त्यानंतर पुण्यात शाळा सुरू केली. अहमदनगर मधल्या त्यांच्या मित्रासोबत महात्मा फुले ही शाळा पाहायला गेले होते.पण या ही शाळा धर्मप्रसारासाठी चालायची. त्यामुळे अनेक जण आपल्या मुलांना ते शाळेत पाठवायला तयार नसत. सर्वसामान्य मुलींपर्यंत शिक्षण पोहोचत नव्हते. फुलेंच्या शाळेत सर्वांना प्रवेश होता. सर्वसामान्य स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे त्यांनी उघडली.
तर भिडे वाड्यातील पहिली शाळा वर्षभरातच बंद पडली. ते पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न महात्मा फुलेंनी केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. पण त्यानंतर शाळा सुरु करणे मात्र थांबले नाही ही शाळा बंद पडली त्यानंतर महात्मा फुलेंनी मुलींसाठी अनेक शाळा सुरू केल्या. फुलेंच्या समग्र वाङ्मयातील नोंदीनुसार मुलींच्या चौथीपर्यंतच्या तीन शाळा पुण्यातच त्यांनी सुरू केल्या होत्या. पुना नेटिव्ह फीमेल स्कूल म्हणून त्या ओळखल्या जात. या शाळांची परीक्षा झाली तेव्हा ती परीक्षा पाहण्यासाठी जवळपास ३ हजार जण जमल्याची नोंद आढळून येते. १२ फेब्रुवारीला पुना कॉलेजमध्ये ही परीक्षा पार पडली. त्या परीक्षेसाठी येणाऱ्या लोकांसाठी खास बैठक व्यवस्था ही करण्यात आली होती. परीक्षा पाहण्यासाठी आलेल्या मंडळींमध्ये भारतीयांप्रमाणे युरोपियन लोक देखील होते. आत जमलेल्या तीन एक हजार लोकांपेक्षा जास्त गर्दी बाहेर होती अशी नोंद सुद्धा आढळून येते. या परीक्षेनुसार उपस्थित लोकांना शाळेसाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. या नोंदीनुसार शाळेतल्या मुलींना अभ्यासाला इसोपच्या दंतकथा, मराठा इतिहास, व्याकरण, आशिया खंड आणि भारताच्या नकाशाविषयीचा परिचय, गणित नीति बोधकथा लिपीधारा आणि अक्षरे असा अभ्यासक्रम होता. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग या शाळेत असल्याची नोंद आहे.
“ Where is भिडेवाडा ” चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक मा. हृदय मानव अशोक सर यांच्या सोबत चर्चा केली असता
माझ्या बाबतीत घडलं ते असं की, दीक्षा या माझ्या लघुपटाच शूटिंग नुकतंच संपले होते. आणि आम्ही सर्वजण चहा पिण्यासाठी एका टपरीवर थांबला होतो. बोलता बोलता अनेक विषय निघाले. खरंतर सामाजिक प्रश्नांवर काहीतरी तयार करून वातावरण गतिशील करणं यात मला धन्यता वाटते. म्हणून वेगवेगळे विषय तपासत असताना भिडे वाड्याचा विषय चर्चेत आला. ही चर्चा करत असतानाच आपण यावर काही करुयात असं बोलून आम्ही तिथून निघालो. दीक्षा लघुपटाची कामे सुरू होती त्यामुळे पुन्हा त्यावर फारशी चर्चा झाली नाही. दीक्षा रिलीज झाल्यानंतर पुन्हा भिडे वाड्याचं खूळ डोक्यात भरलं. अशी ऐतिहासिक मांडणी असणारे विषय घेताना बऱ्याच गोष्टींची तपासणी करावी लागते. संदर्भ अभ्यासून घ्यावे लागतात. जर काही चुकलं, कुणाच्या भावना दुखावल्या तर त्याचा परिणाम फार मोठा होतो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हा एकूणच पिढीसाठी अत्यंत आत्मीयतेचा विषय आहे. त्यामुळे त्यात गल्लत करून चालणार नव्हते.
आपल्या देशात महापुरुषांचे विचार अनुकरण करण्यापेक्षा त्यांचे फोटो वापरून मतांचे राजकारण पद्धतशीरपणे केले जाते. दुसरीकडे काही मंडळी मानवी मूल्य पेरण्याचे काम अविरतपणे करताना दिसते. ही मंडळी बोटावर मोजण्याइतकी असली तरी ती मंडळी महामानवांचं अस्तित्व जगाच्या कल्याणासाठी आहे याची जाणीव करून देते. या पार्श्वभूमीवर भिडे वाड्यावर फिल्म बनवायचं मनातून ठरलं; पण त्यासाठी लागणारा पैसा कुठून आणणार? हा प्रश्न होता.तत्पूर्वी भिडे वाडा घराघरात पोहोचावा, प्रत्येकाने त्याची अवस्था पाहावी, जेणेकरून मन मेंदू गदगदुन जाईल. यासाठी प्रयत्न सुरु केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील विद्यार्थी, शिक्षक, गृहिणी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. एखाद्या ओटीपी प्लॅटफॉर्मसाठी तयार करून मग ते प्रदर्शित करणं जोखमीच गेल असतं. किंबहुना तेवढ्यात ताकदीने पोहोचलं नसतं. कारण कोणीही ठरावीक रकमेचा रिचार्ज मारून सिनेमा बघत नाही. परवडण्यासारखं आहे तीच गोष्ट मोफत दिली तर ती जास्त बघितली जाईल असा विचार माझ्या मनात आला आणि ते करायचं ठरलं. अडचणी नेमकं कोणामुळे येतात? या मागचा मास्टरमाईंड कोण? राष्ट्रीय स्मारक होत का नाही? राष्ट्रीय स्मारक मान्यता कधी मिळाली? कोणत्या साली ही प्रक्रिया सुरु झाली, पुणे महापालिकेचा तिथे खांब दिसतोय; पण पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात ही मोठी वास्तू अशी खितपत का पडली. समाजातले शिकले सवरलेले लोक ते का बनवत नसतील? असे असंख्य प्रश्न घेऊन लिखाणाला सुरुवात केली.मुळात हा विषय काही तासात बसेल असं वाटत नव्हते. कारण तांत्रिक पातळीवर काही मर्यादा येतात. इतकी सगळी पात्र उभी करत असताना नेमकं काय दाखवायचं हे ठरवणं फार गरजेचं असतं. आणि मग त्यातून माझ्या असे लक्षात आले की उद्याच्या येणाऱ्या पिढीला हा भिडेवाडा समजणं फार गरजेचे आहे. भिडे वाड्याची एकूण अवस्था प्रत्येकाने किमान घर बसल्या तरी बघावी आणि पेटून उठाव या विचाराने व्हेअर इज भिडे वाड्याचा निर्मितीचा प्रवास सुरु झाला.आर्थिक हितसंबंधात गुंतले पाय वरती जाण्यासाठी विचारपूस करत असताना तिथल्या पोलिसांनी अडवलं, तिथून मी गेलो नाही म्हणून दांडकेही उभारलं. दुकानदारांना विचारलं तर परवानगी नाही, पाय ठेवला येणार नाही, कोसळून जाईल असं सांगण्यात आलं. इथे गंमत ही आहे की, जर पाय ठेवता येणार नाही तर तुमच्या दुकानांचे छत इतकं शाबूत कसं? तुमच्या दुकानात दिवसभर लोकांची ये जा होते. तुम्हाला कधी वाटलं नाहये का की हा भिडेवाडा झाला पाहिजे?. आपण समंजसपणा दाखवला पाहिजे? पण या प्रश्नांना काही किंमत नव्हती, कारण त्या भागात, त्या जागेत मोठ अर्थकारण सेट झाल होतं. आपल्याला माहिती आहे रस्त्यालगत असलेले व्यवसाय हे आर्थिकदृष्ट्या ताकदवान असतात. तिथून काढता पाय घेणे कोणालाही परवडत नाही. मग अशावेळेस अस्मिता, प्रतीक याला किंमत शून्य असते. आपण खूप स्वार्थी होतो. तशी परिस्थिती त्या प्रक्रियेत जाणवली
राष्ट्रीय स्मारक कसा असावा :
भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारक होत असल्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे, परंतु या स्मारकाचं अंतिम उद्देश महत्त्वाचं आहे. जर हे स्मारक लोकांचं समाधान मिळवण्यासाठी किंवा राजकीय हेतू साधण्यासाठी होत असेल, तर ते नक्कीच प्रश्न उपस्थित करतं. महिलांच्या अधिकारांसाठीच्या शैक्षणिक चळवळीचा इतिहास लक्षात घेतल्यास, भिडे वाडा एक प्रतीक असावा, ज्यामुळे महिलांना माणूस म्हणून स्वीकारलं गेलं. यामुळे स्मारक केवळ एक भव्य प्रतिमा नसून, शाळा उघडून आणि सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या कार्याचा इतिहास जागर करून शिक्षणाच्या प्रसाराचे केंद्र बनलं पाहिजे. महापालिकेने यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत, परंतु राजकीय दबावामुळे कामात अडथळे येऊ शकतात. स्मारकाची उपयोजना केवळ इमारत बांधणे किंवा त्याची घोषणा करण्यापुरती मर्यादित नसून, ती सर्वांसाठी खुली करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना आणि समाजातील सर्व घटकांना या महत्वाच्या इतिहासाची माहिती देणे अत्यावश्यक आहे. जर स्मारकाचा उपयोग राजकीय हेतूंसाठी झाला. तर तो अपयश ठरावा. तथापि, सजग पिढी याला विरोध करण्यास सज्ज आहे, हे सांगितले आहे. विद्वान व्यक्तींचा सहभाग आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे या प्रकल्पाला अधिक वजन मिळत आहे. लवकरच मुलींसाठी शाळा खुली केली जाईल, ज्यामुळे ज्ञानाचा प्रवाह वाढेल. भिडे वाडा फक्त एक जागा नाही, तर एक विचार आहे, जो प्रत्येकाच्या अस्मितेचा गौरव करतो. त्यामुळे “व्हेअर इज भिडेवाडा” ऐवजी “हियर इज भिडे वाडा” असा अभिमानाने सांगता येईल. राष्ट्रीय स्मारकाच्या कायदेशीर कारवाई मध्ये ज्यांचे योगदान आहे त्या एडवोकेट निशा चव्हाण मॅडम यांच्यासोबत चर्चा करताना खालील मुद्दे आम्हाला आढळून आले.
ॲड.निशा चव्हाण यांनी २०१० मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये विधी अधिकारी म्हणून रुजू होण्यापासून भिडे वाड्याच्या प्रकरणात केलेल्या कार्याची कहाणी अत्यंत प्रेरणादायक आहे. २०१३-१४ च्या सुमारास त्यांना भिडे वाडा संदर्भित एक फाईल मिळाली, ज्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महत्ता त्यांच्या मनात खोलवर रुजली. शाळेच्या सुरुवातीच्या काळात सावित्रीबाईच्या प्रेरणेमुळे मुलींच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न त्यांच्या दृष्टीसमोर आले. जून २०२१ मध्ये, विधी विभागाच्या पदभारानंतर, त्यांनी भिडे वाडा प्रकरणाला टॉप प्रायोरिटी दिली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन आणि कोर्टात युक्तिवाद करून, त्यांनी महापालिकेच्या बाजूने एक मजबूत केस तयार केली. या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या, परंतु त्यांनी सामाजिक हिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडले.कोर्टात अनेक सुनावण्या झाल्या, आणि अंतिम सुनावणी १६ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली. कोर्टाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिला, ज्यामुळे चव्हाण यांना आनंदाच्या अश्रू अनावर झाले. याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीनी उच्च न्यायालयात याचिका केली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या निर्णयाचे समर्थन केले.संपूर्ण प्रक्रियेत अडचणींचा सामना करत, चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी महत्त्वाचे कार्य केले. भिडे वाडा आता पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देणारे स्मारक म्हणून उभा राहणार आहे.
अखेर भिडेवाडा स्मारकाचा आराखडा निश्चित महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिवाजी रस्त्यावरील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. त्या भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी विविध घटकांकडून अनेक वर्षे केली जात होती.वेळोवेळी राज्यातील शासनकर्त्यांनी याला मान्यताही दिली. मात्र, वाड्यातील भाडेकरूंनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने अनेकवर्षे भूसंपादन रखडले होते. दोन महिन्यांपुर्वी न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल देत भाडेकरूंना योग्य तो मोबदला देत भूसंपादन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाड्याचा ताबा घेउन धोकादायक वाडा पाडला आहे. त्यानंतर महापालिकेने वास्तूविशारदांकडून स्मारकाच्या आराखड्याचे प्रस्ताव मागविले आहेत. त्यानुसार सातहून अधिक प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्याचे सादरीकरण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या समोर झाले.यावेळी समता परिषदेचे अध्यक्ष व राज्यातील मंत्री छगन भुजबळ हे देखिल उपस्थित होते. याठिकाणी पुन्हा शाळा सुरु करावी, असा आग्रह भुजबळ यांनी धरला होता. त्यानुसार आराखडे तयार करण्यात आले आहेत. परंतू या ठिकाणी शाळा असावी, की ऐतिहासिक भिडेवाड्याची रिप्लिका उभारण्यात यावी, यावरून अंतिम निर्णय होऊ शकत नव्हता. अखेर आराखड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
असे असेल स्मारक :
तळमजला अधिक तीन असे चार मजल्यांचे स्मारक असेल.तळघरात दुचाकी पार्किंग, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे, महात्मा दाम्पत्याचे सामाजिक कार्य विविध भाषांमध्ये चलचित्रांसह पाहण्याची व ऐकण्याची सुविधा. ग्रंथालय आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण वर्ग.अखेर भिडेवाडा स्मारकाचा आराखडा निश्चितमहात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिवाजी रस्त्यावरील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.
संदर्भसूची :
https://youtu.be/-1XF4zu_1Yw?si=BZZvvUkDA14vT705
प्रो. हरी. नरके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन
प्रो. हरी नरके, महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा
प्रा. हरी नरके, महात्मा फुले साहित्य आणि चळवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि राजश्री शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र राज्य
Leave a Comment