वाचनसंस्कृतीस प्रोत्साहन देणाऱ्या प्रिय वाचक मित्रांचे आणि दर्शकांचे सिनेसृष्टी या ब्लॉग मध्ये आम्ही स्वागत करतो.आजच्या काळात एकीकडे वाचन संस्कृती लयास जात असतानाच दुसरीकडे आपल्यासारखी मंडळी वाचणाला आपल्या आयुष्याचा अभिन्न अंग बनवून बसली आहे याचा आनंद होतो. डिजिटलीकरणामुळे वाचनाचे स्वरूप जरी बदलले असले तरी तुम्ही या ब्लॉगला भेट दिल्याने स्पष्ट होते की वाचन संस्कृती अजून शाश्वत आहे .
या ब्लॉग चा मुख्य गाभा विषय “मराठी चित्रपट सृष्टीतील शोधकार्य ” असा आहे. या विषयाला केंद्रीभूत ठेवून मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक, अभिनेते, गीतकार व गायक यांचे मराठी चित्रपटसृष्टीविषयीचे प्रश्नात्मक व अनुभवात्मक विवेचन मांडले गेले आहे.
या विषयाचा सखोल धांडोळा घेण्यासाठी “ म्होरक्या ” या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शक,अभिनेते व निर्माते अमर देवकर, प्रसिद्ध अभिनेते व अलीकडेच “ चौक ” या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलेले देवेंद्र गायकवाड यांच्याशी चर्चा केली. “ बबन ” , “ चौक ” या चित्रपटांमधील अनुक्रमे “साज ह्यो तुझा..” , तुझ्या डोळ्याच्या डोहातं .. या सारखी अफलातून शब्द रचना करणारे, गीतकार सुहास मुंडे यांचे व ज्यांच्या आवाजामुळे मराठी चित्रपटसृष्टीला त्यांची दखल घ्यावी लागत आहे असे गायक,संगीतकार ओंकारस्वरूप बागडे यांचे मत जाणून घेतले आहे.
म्होरक्या या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर मराठी चित्रपटसमोरील आव्हांनाचे अनुभव कथन करताना सांगतात की, पूर्वी मराठी चित्रपट हा केवळ महानगरीय शहरांपूरताच मर्यादित होता. मुंबई,पुणे, कोल्हापूर इ. चित्रपटगृहांची कमतरता होती . अनेक जिल्ह्यात चित्रपटगृह व त्या संबंधित आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव होता. आज जिल्हा पातळीवर जरी चित्रपटगृहांची उभारणी केली गेली असेल मात्र आज मराठी चित्रपटांसामोर व स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांसामोर, दिग्दर्शकांसमोर बरीचशी आव्हाने आहेत. ज्यांना चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी नाही आशा सर्वांसमोर आव्हाने आहेत .
नवख्या दिग्दर्शकांना निर्माते न मिळण्यापासून ते चित्रपट वितरणापर्यंत अनेक संमस्यांना समोर जावे लागते. प्रत्यक्ष अनुभवावरून सांगायच झालच तर मला म्होरक्या बनवताना सुद्धा सुरुवातीला निर्माते मिळत नव्हते . आम्हाला अगोदरच्या चित्रपटाला मिळालेल्या बक्षिसातून मी व माझ्या टीम ने म्होरक्याच प्रि-प्रॉडक्शनच काम सुरू केल होत. त्यामुळे मला असे वाटते की नवख्या कलाकारांमध्ये क्षमता आहेत मात्र त्यांना संधी मिळत नसल्याने त्यांच्यातील क्षमता,कलागुण दृष्टिपटलावर येत नाहीत. त्यानंतर वितरण साखळीतील लोक नवख्या चित्रपट निर्मात्यांस खायला बसलेले असतात . नवखे चित्रपट निर्माते एखाद्या चित्रपटानंतर दूसरा चित्रपट बनवतील की नाही या बाबत वितरकांमध्ये साशंकता असते . मोठ्या प्रॉडक्शन हाऊस चे चित्रपट चालत नसतील तरीदेखील त्यांना पडदे उपलब्ध करून दिले जातात. कारण त्यांचा कोणता तरी सिनेमा चालणार असतो. ते एका वर्षात 3,4 चित्रपट बनवणार असतील तर एखादा सिनेमा चालला तरी त्यांचा परतावा मिळतो. लहान निर्मात्याचा एक चित्रपट चालला नाही तर दूसरा निर्माण करण्यासाठी कचरतात. त्यामुळे त्यांच्या चित्रपट निर्मितीत सातत्य राहत नाही. परिणामी चित्रपट सृष्टीत त्यांची विश्वासहार्यता राहत नाही. चित्रपट कथांमध्ये नाविन्यतेचा अभाव आहे. एकसाची कथांनी मराठी सिनेमा उबून गेला आहे . उदा . प्रेमकथेवर आधारित चित्रपट. सैराट सारख्या प्रेमकथेवर आधारलेल्या चित्रपटानंतर अनेक निर्मात्यांनी व दिग्दर्शकांनी आपले बस्थान प्रेमकथांकडे वळवले. त्यामुळे प्रेक्षकांना ते रटाळ वाटत असावे. मला असे वाटते की मराठी सिनेमा कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवण्याचे काही प्रमाणात हे देखील कारण असावे. यामुळे निर्मात्यांनी चित्रपट निर्मितीसाठी खर्च केलेला पैश्याचा परतावा होत नाही. पडदा न मिळणे , मोठ्या प्रॉडक्शन हाऊसच्या, बॉलीवूडच्या चित्रपटांसोबत स्पर्धा करावी लागल्याने आशयघन, चांगले चित्रपटही चालत नाहीत .
चौक या चित्रपटाचे दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड मराठी चित्रपटांसामोरील आव्हाने सांगताना म्हणतात की, आम्ही प्रदर्शित केलेले चित्रपट रसिक प्रेक्षकांसमोर तेवढ्या ताकदीने पोहचत नसतील तर हे आमचंच अपयश आहे. ओ टी टी मध्यमांमध्ये वाढ झालेली आहे मात्र ओ टी ओ टी टी मुळे चित्रपटगृहे ओस पडली आहेत असे म्हणणे अतिशोक्ती ठरेल. उच्च दर्जाचा चित्रपट व प्रेक्षक वर्गाची आवड लक्षात घेऊन चित्रपट बनवला गेला तर तो नक्की चालतो . मात्र अलीकडे प्रदर्शित झालेला नाळ भाग 2 सारखा सिनेमा पाहण्यास गर्दी न होणे नक्कीच धक्कादायक आहे.
कांतारा सारखा दक्षिणेचा चित्रपट महाराष्ट्रात प्रचंड चालतो मात्र मराठी चित्रपटाला तेवढासा प्रतिसाद मिळत नाही हे खरे आहे . परंतु मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवत आहेत असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही . याच वर्षी प्रदर्शित झालेले चित्रपट वेड, बाईपण भारी देवा सारखे चित्रपटनांना मराठी प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला हे विसरता येणार नाही. चौक देखील 36 दिवस जोमात चालला , प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती . असे म्हटले जाते की नवीन लोकांना संधी मिळत नाहीत मात्र असे काही नाही मी देखील दिग्दर्शनात नवीनच होतो मला जी हवी ती मदत मिळाली . अभिनेता म्हणून काम करण्याअगोदर मी नाटक करायचो त्यातून माझ काम माझ्या सीनियर पर्यंत पोहचत गेलं. मग मला अभिनेता म्हणून संधी मिळत गेली. म्हणून मी नवख्या कलाकारांना ज्यांना या क्षेत्रात यायच आहे त्यांना एवढेच सांगेल की संघर्ष आहेच तो प्रत्येकाला करावा लागतो , मी देखील केला आहे. अभिनेता म्हणून काम करायचे असेल तर तुम्ही कास्टिंग डायरेक्टर लोकांना भेटा . तुम्ही नवखे आहात म्हणून तुम्हाला कोणीही डावलणार नाही.
मराठी चित्रपटसमोरील आव्हाणांविषयी बोलताना गीतकार सुहास मुंडे म्हणतात, मला असे वाटते की चित्रपट गृहात एकाच वेळी दोन वा दोनपेक्षा अधिक मराठी चित्रपट पडद्यावर यायला नकोत . मराठी निर्मात्यांनी एकरूप होऊन एकसंधपणे काम केले पाहिजे. चित्रपट प्रदर्शित करण्याअगोदर निर्मात्यांमध्ये विचार- विनिमय होणे आवश्यक आहे .
चित्रपट क्षेत्र हे “बाप दाखव नाहीतर श्राध्य घाल ” या म्हणीनुसार झालं आहे. हे चित्रपट सृष्टीतील सर्वच कलाकारांसाठी लागू पडते. आज जो स्टार आहे तो उद्या असेलच असे नाही. आज एखाद्या दिग्दर्शकाचा चित्रपट चालला तर पुढचाही चालेलच याची शाश्वती नाही. मराठी चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांना आपला चित्रपट लोकांपर्यंत पोहचवता येत नाही, त्याच मार्केटिंग करता येत नाही . त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी मार्केटिंग व्यवस्थेशी ज्ञान मिळवण, शिक्षित होणं गरजेच आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमची कलाकृती पडद्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशी पोहचविता येईल यासाठी प्रयत्नशील राहायला हवे . वितरण व्यवस्थेतील गणितं समजून घेणे आवश्यक आहे .
कमी कालावधीत लोकप्रिय ठरलेले व चित्रपट सृष्टीत दखल पात्र काम करणारे गायक ओंकारस्वरूप बागडे सांगतात की चित्रपटाचा जीव गीतांमध्ये असतो. अनेक चित्रपट त्यातील गीतांवरून प्रेक्षकांपर्यंत पोहचतात . चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना आवडली की चित्रपटाला ही पसंती मिळू लागते. मला वाटते मराठी चित्रपट सृष्टीतील गाण्यांमध्ये विविधता यायला हवी. नवीन गायकांना त्यांच्या क्षमतेनुसार संधी मिळायला हव्यात. अलीकडच्या काळात समाज माध्यमांमुळे संधी मिळणं शक्य झालेलं आहे. चित्रपटाच्या अगोदर गाणी प्रदर्शित करूने ही व्यूहरचना चित्रपटास प्रसिद्धी मिळवून देते . यातून प्रेक्षक चित्रपटाकडे वळवले जातात. मात्र नेहमीच अशा व्यूहरचना यशस्वी होतील असे नव्हे . ओ टी टी माध्यमांचा चित्रपटांवर व चित्रपटगृहावर अश्या दोन पातळ्यांवर प्रभाव पडलाय अस म्हणाव लागेल. एकतर ओ टी टी मध्यमांमुळे चित्रपट अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहे. प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहातच जावे लागणारे दिवस आता संपले आहेत. कमी खर्चात आपल्या वेळेनुसार ते चित्रपट पाहू लागले आहेत . मात्र यामुळे चित्रपट गृहांवर मोठा नकारात्मक परिणाम जाणवतो आहे असे वाटत नाही. ओ टी टी हे केवळ परवडण्यायोग्य व नजीक चित्रपटगृह्याची अनुपलब्धता असणे याला पर्याय ठरले आहेत असे मला वाटते .
अश्या प्रकारे मराठी चित्रपटांच्या पडझडी विषयी कलाकारांचे संमिश्र मते आहेत . यावरून असे म्हणता येईल की काही मराठी चित्रपटांना नक्कीच आव्हांनाचा सामना करावा लागला असेल मात्र दर्जेदार सामग्री असलेला नावीन्यपूर्ण विषयावर बनवलेला चित्रपट पाहण्यास प्रेक्षक मोठी गर्दी करतात. तांत्रिक बाबींच्या समस्यांना काही निर्मात्यांना सामोरे जावे लागते हे सत्यही मानावे लागेल. परंतु चित्रपट क्षेत्राचा पूर्ण अभ्यास,आकलन केलेल्या व्यक्तीस यश मिळते हे वास्तवही नाकारता येत नाही .