वाहतूक कोंडी, पुणेकरांची डोकेदुखी…

Pune traffic

वाहतूक कोंडी, पुणेकरांची डोकेदुखी…

सकाळी-सकाळी वृत्तपत्र हातात घेतलं किंवा वृत्तवाहिनीचं सकाळच बातमी पत्र जरी पाहिलं, तर त्यामध्ये एकतरी बातमी असते ती म्हणजे रस्ते अपघाताची, अमुक-अमुक व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू आणि यामध्ये पुण्याच नाव आघाडीवर नसेल तर नवलच वाटायला हवं! एकीकडे विराट कोहली धावांचा पाऊस पडून जसे नव-नवे विक्रम करतोय, तर दुसरीकडे पुणेकर रस्ते अपघातांचे नव-नवे विक्रम करतांना दिसत आहे. पुण्यातील  रस्ते अपघातांची संख्या नक्कीच थक्क करणारी आहे. तर पुण्यातील वाहतूक नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार मागील दिड वर्षामध्ये ५२७ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याच आढळून आलं आहे. तर का होतात हे अपघात? याला नेमकं जबाबदार तरी कोण? नागरिक प्रशासनाला दोषी ठरवतात आणि प्रशासन नागरिकांना, पण या समस्येच मूळ काय? 

    जर आपण पाहिलं तर लक्षात येत की, रस्त्यांची होत चाललेली दुरावस्था आणि सतत होणारी वाहतूक कोंडी या सगळ्याला जबादार असल्याच दिसून येत. का होतीये ही वाहतूक कोंडी? काय कारणं असतील या वाहतूक कोंडीचे? 

पुणे आणि वाहतूक कोंडी…

  जर आपण पुण्यातील एख्याद्या आजोबाला म्हणजे ज्याचं बालपण पुण्यात गेल अश्या एखाद्या व्यक्तीला पुण्याबद्दल काही विचारलं, तर त्यांच्या तोंडी पाहिलं वाक्य येत. पूर्वी असं नव्हत हो पुणे, फार बदललं आता. सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल पुणे आता मेट्रो शहर म्हणून ओळखल जाऊ लागलं आहे. काळाबरोबर पुणे शहर प्रगती करत गेलं खरं, पण त्याच बरोबर अनेक समस्या ही ओढून घेऊ लागलं त्यातलीच महत्वाची म्हणजे, सतत होणारी वाहतूक कोंडी

ऑक्टोबर २०२२ मधील Times Now च्या अहवालानुसार पुण्यामध्ये नोंदणीकृत वाहनांची संख्या जवळपास ४५ लाखांपेक्षा अधिक आहे. त्यापैकी ३२ लाख दुचाकी वाहने असून, १३ लाखांपेक्षा जास्त अन्य वाहने आहेत. आणि यंदाच्या वर्षी दिवाळीच्या कालवधी मध्ये पुणेकरांनी २५ हजार ४५० नवीन वाहनांची खरेदी केल्याच वृत्त अनेक वृत्तपत्रांमध्ये आपण पाहिलं. आता एवढ्या प्रचंड संख्येने वाहने रस्त्यावर उतरत असतांना, वाहतूक व्यवस्थेचे कंबरडे मोडल्या शिवाय राहणार नाही हे तर खर आहे.

आज पुण्यातील विद्यापीठ गेट, स्वारगेट किंवा चांदणी चौक सारख्या ठिकाणी आठी पहर नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येच्या सामना करावा लागतो. कारण शहराच्या मध्यावधी येणाऱ्या स्वारगेट सारख्या भागामध्ये मेट्रोचे काम सुरु असल्याने, रस्त्याचा बराचसा भाग त्यामध्ये व्यापला गेला असल्याचे आढळून येते. पण एवढ्या रहदारीच्या ठिकाणी वाहनांची ये-जा करण्यासाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था प्रशासनाने केली नसल्याच चित्र दिसत. अरुंद रस्त्यावरून अवजड वाहनांची होणारी वाहतूक, तसेच अतिक्रमण यासारख्या असंख्य कारणांमुळे अनेक वेळा या भागात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

आता जर विद्यापीठ गेट परिसराबद्दल बोलायचं झाल, तर इथे देखील मोढ्या प्रमाणात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामागील मुख्य कारण म्हणजे, बानेर,पाषाण, औंध,गणेश खिंड रोड, सेनापती बापट रोड यांसारख्या महत्वाच्या भागांना जोडणारा हा परिसर असल्याने, वाहतूक कोंडी पाहायला मिळते. तसेच या भागात देखील सुरु असलेले मेट्रोचे काम, बांधकामासंबंधित वाहतूक तसेच अवजड वाहनांची वाहतून आणि रस्त्यांची कमी झालेली रुंदी या सगळ्यांचा परिणाम म्हणजे विद्यापीठ परिसरात सतत होणारी वाहतून कोंडी, या संबंधित आम्ही वाहतूक अधिकाऱ्यांशी सवांद साधला त्यावेळी ते म्हणाले, “ या भागात मुख्तः सकाळी ८ ते ११ आणि रात्री ५ ते ९ या वेळे दरम्यान प्रचंड प्रमाणात वाहतूक पाहायला मिळते. यामध्ये मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले, महाविद्यालयीन मुले आणि कर्मचाऱ्यांची रहदारी पाहायला मिळते. यावेळात वाहतूक नियंत्रण करणे हे वाहतूक पोलिसांसमोर देखील मोठे आव्हान असते.”

    तसेच या वाहतूक कोंडीचा सामना फक्त वाहनचालकांनाच करावा लागतो असे नसून पादचाऱ्यांना देखील अनेक समस्या येत असल्याच दिसून येत. आम्ही या वेळी काही पादचाऱ्यांनशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तर ते म्हणाले, “ इकडे झेब्रा क्रोस्सिंगची समस्या जाणवते, जिथे असल्याला हवे तिथे पाहायला भेटत नाही. यामुळे रस्ता ओलांडणे हे देखील एक आव्हान असते. तसेच सिग्नलची व्यवस्था देखील या भागात निट नसल्याने, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.”

यानंतर जर आपण पाहिलं तर अप्पा बळवंत चौक ही पुण्यातील मोठी बाजार पेठ आहे. पण अश्या ठिकाणी देखील प्रशासनाकडून वाहतूक नियंत्रणासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात येत नसल्याच दिसून आलं. जर नियमानुसार पाहायला गेल तर प्रत्येक दुकानाची स्वतंत्र्य पार्किंग असणे आवश्यक आहे. पण एवढ्या मोठ्या बाजार पेठेत प्रत्येक दुकानासाठी स्वतंत्र पार्किंग, शक्य नाही. पण किमान काही दुकाने मिळून त्यांच्या ग्राहकांसाठी पार्किंगची सुविधा नक्कीच पुरवू शकतात. पण अशी कुठलीच उपाय योजना प्रशासना कडून किंवा दुकानदारांकडून करण्यात येत नाही. त्या भागात असलेली पर्गिंगची सुविधा तोकडी पडते आणि मग त्यामुळेच नागरिकांना प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

वाहतूक कोंडी विषयी नागरिकांना काय वाटत?

जासकी आपण पुण्यातील नोंदणीकृत वाहनांची संख्या पहिली, पण पुण्याला “विद्येच माहेरघर म्हंटल्या जाते” याच कारणाने असंख्य तरुण महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्यातून शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा उद्योगधंद्यांसाठी पुण्यामध्ये येत असतात. अश्यातच काहीजण आपली स्वतंत्र वाहने देखील बाळगून असतात. या वाहनांची नोंदणीकृत संख्या आपल्याला कुठेही उपलब्ध होणार नाही.
तर यामध्ये अनेक तरुण, तरुणी हे ग्रामीण भागातून किंवा निमशहरी भागातून देखील देखील आलेले असतात. अश्यावेळी या लोकांना पुण्यात वाहन चालवतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणाहून पुण्यात आलेला आदित्य वाहतूक कोंडीवरती बोलतांना म्हणतो, “मला सुरवातीच्या काळात पुण्यात वाहन चालवतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. इथली सम-विषम पार्किंग व्यवस्था लक्षात न आल्याने माझी गाडी दोन वेळा जप्त देखील झाली होती. तसेच मी केलेल्या चुकीच्या वाहन पार्किंग मुळे बरेचदा वाहन कोंडी देखील झाली. इथली वन-वे व्यवस्था समजावून घेतांना देखील नवख्यांचा गोंधळ उडतो. त्यामुळे प्रशासनाने योग्य अशी माहिती मिळेल अशी काही तरी व्यवस्था करायला हवी” असं या तरुणाला वाटत.

वाहतूक कोंडी या प्रश्नावरती बोलतांना, स्मिता म्हणते, “ज्यावेळी कोणी VIP व्यक्ती शहरामध्ये येणार असतो त्यावेळी नागरिकांना अनेक वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. VIP च्या सुरक्षेकरिता म्हणून, अनेक मार्ग सामान्य नागरिकांसाठी कुठलीही पूर्व कल्पना न देता बंद करण्यात येतात. अश्यावेळी नागरिकांची तारांबळ उडते.”

वाहतूक कोंडी बद्दल तुम्हाला काय वाटत? असा प्रश्न आम्ही एका रीक्षेवाल्या काकांना विचारला असता, ते म्हणाले “वाहतूक कोंडी ही आता आमच्या अंग्वालानीच पडली आहे. पण सार्वजनिक सणांच्या काळात फार त्रास होतो. ठीक-ठिकाणी मंडळांचे शेड्स लागलेले असतात अश्यावेळी कुठला रस्ता चालू आहे आणि कुठला बंद हेच लक्षात येत नाही. आणि याचा परिणाम वाहतुकीवर होतो” असं या काकांना वाटत.

यावरती उपाय काय?

लंडन मध्ये २००३ पासून वाहतूक नियंत्रण ही महत्वाची समस्या समजली जात असून यावरती ठोस पाऊले उचलण्याचा निर्णय तेथील प्रशासनाने घेतला. यानंतर त्यांनी अनेक उपाय योजना करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला. त्यानंतर त्यांनी अनेक भागांमध्ये खासगी वाहनांच्या प्रवेशावरती बंदी घातली त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत त्याला खासगी वाहनापेक्षा सार्वजनिक वाहनांचाच वापर अधिक प्रमाणत करावा लागतो. यामुळे त्यांना प्रदूषण रोखण्यात देखील मोठे यश आले आणि वाहतूक कोंडीची समस्या देखील कमी झाली.

पुण्यातील पेठेतील रस्ते देखील रुंदीने फार लहान आहेत. अश्यावेळी वाहनांची संख्या अधिक झाल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. जर या भागात खासगी वाहनांना बंदी घातली आणि फक्त सार्वजनिक वाहतूक होईल अशीच व्यवस्था येथे केली तर वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यात या भागात यश येईल.

त्यानंतर जर शहरात दरवर्षी वाढणाऱ्या नोंदणीकृत वाहनांवरती मर्यादा आणली. त्याच सोबत पर्यावरण पूरक क्षेत्र निर्माण करून पादचारी, सायकलस्वार, ई-बाईक, रिक्षा यांना प्राधान्य द्यायला हवे, या व अश्या छोट्या-छोट्या उपाय योजना, खूप मोठा परिणाम दाखू शकतात. मात्र “हीच ती वेळ” असे म्हणून वाहतूक कोंडीकडे गांभीर्याने भागण्याची फार आवश्यकता आहे. नाही तर याचे फार गंभीर परिणाम ओल्याला भोगावे लागू शकतात

Tags , , ,

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *