
१९७० च्या दशकात महाराष्ट्राला हादरवून सोडणारं, सबंध देशभर गाजलेलं पुण्यातील हत्याकांड प्रकरण म्हणजे जोशी-अभ्यंकर हत्याकांड. पुणे हे त्या वेळेस ‘पेन्शनकरांचे पुणे’ म्हणून ओळखले जात होते. पानशेतच्यापुराचा धक्का पुणेकरांनी नुकताच पचवला होता. पुण्याची क्षितिजे विस्तारत होती. पुण्याची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख याच काळात अधोरेखित होऊ लागली होती. देश पातळीवर आणीबाणीचा धक्का बसलेला असतानाच, या खून सत्राने मात्र त्या काळच्या छोटेखानी शहर असणाऱ्या पुण्यात प्रचंड दहशत पसरली होती. ही दहशत एवढी प्रचंड होती की, साडेसहा-सातनंतरच शहरात शुकशुकाट व्हायचा. एरवी गजबज असलेल्या तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता या भागातही संध्याकाळी अंधार पडताच सामसूम व्हायची.
जोशी हत्याकांड:
३१ ऑक्टोंबर १९७६ रोजी दहशतीची सुरुवात झाली. अच्युतराव जोशी यांचं कुटुंब विजयनगर कॉलनी येथे राहत होते. त्यांच्या परिवारात पत्नी उषा जोशी आणि मुलगा आनंद जोशी राहत होता. रात्री ८:३० च्या सुमारास अचानक त्यांचा दरवाजा वाजला. जोशीकाका उठलेआणि दरवाजा उघडला. बाहेर एक विशीतला एक मुलगा उभा होता. कोण आहेस तू? कोण पाहिजे तुला? असं त्यांनी विचारलं. तो म्हणाला आनंद आहे का घरात? मी त्याला भेटायला आलो आहे. तेव्हा जोशीकाका म्हणाले, आनंद येईलच इतक्यात, ये तू आत ये बैस. असं म्हणून त्यांनी त्याला आत घेतलं आणि दरवाजा बंद केला. ते पुढे चालू लागले तेव्हा याने हळूच दोन पावले मागे येऊन दरवाजाची कडी उघडली. ते दोघेजण आतल्या खोलीत आले. जोशीकाका बसण्यासाठी वाकले तोच त्याने त्यांची मान पकडली धारदार सुरा काढला आणि त्यांच्या मानेवर लावला. काका पुरते घाबरून गेले. काय होत होतं त्यांना काही कळत नव्हतं. ते ओरडले. तेव्हा काय झालं आहे हे बघण्यासाठी काकू मागे वळल्या त्या दचकल्याच, भीतीने त्यांच्या अंगावर शहारे आले. त्या थरथर कापू लागल्या. तीन उंच धिप्पाड माणसे त्यांच्या समोर दानवासारखी उभी होती.
त्यांनी काकूंच्या गळ्याला नायलॉनच्या दोरीने आवळले. त्यांच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. इकडे काकांना तो वरच्या खोलीत तिजोरीपाशी घेऊन गेला. कुलूप उघडून सगळी तिजोरी रिकामी केली. आणि तिथेच काकांच्या पोटात सुरा खोपसला. ती खोली रक्ताळली. इकडे खाली काकूंच्या गळ्याला दोरीचा फास आणखी आवळला जात होता. त्या तडफड करत होत्या. शेवटी त्यांनी प्राण सोडला..!
इतक्यात दारावरची बेल वाजली. हे चौघेही जण दाराजवळ गेले. दाराच्या मागे लपले. एकाने दार उघडलं. आनदं आत आला. इतक्यात चारही बाजूंनी त्याच्यावर झडप घातली गेली. काय होत आहे त्याला कळत नव्हते. त्याला श्वास घेता येईना. कारण नायलॉनच्या त्या दोरीचा फास त्याच्या गळ्यावरही आवळला गेला होता. पुढच्याच क्षणी तो गतप्राण झाला. बाहेर पडतांना सगळे पुरावे नष्ट केले. उग्र वासाचं अत्तर सगळीकडे फव्वारलं. फव्वारलं नव्हे ओतलं. त्यामुळे पोलिसांच्या श्वानाला कुठलाही माग काढणं अशक्य ठरलं.


फसलेला डाव :
उद्योजक बाफना यांचा प्रशस्त “त्रिशला” बंगला त्या निवांत कॉलनीच्या एका टोकाला होता. त्या काळात शंकरशेठ रोडवर फारशी वस्ती नव्हतीच. या टोळीने दार ठोठावलं त्या वेळी बाफना घरात नव्हतेच. पत्नी यशोमती घरात एकटीच होती. राजूजैन नावाचा त्यांचा एक नातेवाईक त्यांच्याकडे राहायचा. तो होता आणि फारुख हकीम नावाचा एक जुना वयस्कर नोकर एवढेच घरात होते. रात्री बारा वाजता दाराची बेल वाजली. नोकर उठला. त्याने दरवाजा उघडला. झोपेत असल्याने त्याला नीटसं काही दिसलं नाही. अचानक त्याच्यावर त्यांनी झडप घातली
आणि नायलॉनच्या दोरीचा फास त्याच्या गळ्याभोवती आवळला. तसा तो नोकर घाबरला आणि त्याने आरडा-ओरडा सुरू केला. दूर पर्यंत त्याच्या किंकाळ्या ऐकू जाऊ लागल्या. तेव्हा बाफना कुटुंब जागं झालं. आणि आसपासच्या परिसरात सुद्धा पटापटा घरांमध्ये लाईट लागू लागले. तसा एक दगड बाहेरून आता आला. लगेच नोकराचा फास ढिला झाला. ते दोघे पळून गेले. बाहेरचे दोघे सुद्धा फरार झाले. आणि नोकराच्या ओरडण्याने पूर्ण बाफना कुटुंबाचा जीव वाचला होता. बाफना कुटुंब नामी आणि श्रीमंत असल्यानेही बातमी पण दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत झळकली. या घटनेने पुणे मात्र प्रचंड हादरलं होतं. लोकांच्या मनात भीती पसरली होती. पुण्याच्या कुठल्याही भागात आवाज यायचा तो भटक्या कुत्र्यांचा, रातकिड्यांचा आणि शांततेचा..!
अभ्यंकर हत्याकांड:
१ डिसेंबर १९७६ रोजी तर मृत्यूने तांडवच केल. भांडारकर रोड, लॉ कॉलेज रोडवर आजच्यासारखी गर्दी अजिबात नसे. बंगल्यांच्या वसाहती सूर्यास्तानंतर शांत, निवांत पहुडल्यासारख्या दिसत. तेव्हा तो परिसर विरळ लोकवस्तीचा परिसर होता. भांडारकर इन्स्टिट्यूटच्या जवळच संस्कृतपंडित काशिनाथशास्त्री अभ्यंकर राहायचे. या 88 वर्षांच्या विद्वानांना संस्कृतमधील काही शंका विचारायला म्हणून चार तरुण पोरांनी स्मृती बंगल्यावर थाप मारली. घरात नात, छोटा नातू, काशिनाथशास्त्री आणि त्यांची पत्नी इंदिरा एवढीच मंडळी होती आणि घरगुती कामं करणारी मदतनीस सखुबाई वाघही होती. सखुबाईने दरवाजा उघडला आणि शास्त्रीबुवांना निरोप देण्यासाठी ती जात असतांना एकाने झडप घालून तिचं तोंड आवळलं. चाकूचा धाक दाखवत हात-पाय बांधले. तीच गत वयस्कर इंदिराबाईंची केली. खाली गडबड ऐकून काशिनाथशास्त्रींची नात बाहेर आली तर तिलाही दोरीने बांधली. तोंडात बोळा कोंबला. काशिनाथशास्त्री काय झालं बघायला येऊन आरडाओरडा करेपर्यंत चोर तिजोरीपाशी पोहोचले होते. घरातील किमतीऐवज भराभर बॅगेत भरले आणि आवाज बाहेर जाऊ नये म्हणून सगळ्यांचे गळे नायलॉनच्या दोरीने घट्ट आवळले. तितक्याच थंडपणे या मानवरूपी जनावरांनी स्वयंपाकघरातलं अन्न जेवणाच्या टेबलावर मांडून रितसर जेवले आणि लूट घेऊन पसार होण्यापूर्वी घरभर उग्र दर्पाच्या अत्तराची फवारणी केली.

दहशतीत पुणे:
या घटनेनंतर तर पुणे एका अप्रत्यक्ष दहशतीखाली वावरू लागले होते. प्रकांड पंडित अशी ख्याती असलेल्या काशिनाथशास्त्री अभ्यंकर यांचा त्यांच्या पत्नी इंदिराबाई, नातू धनंजय, नात जाई आणि त्यांच्या घरात काम करणाऱ्या सखूबाई वाघ या पाच जणांचा खून झाल्याची बातमी पुण्यातील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. हे सुशिक्षित दिसणारं टोळकं घरात शिरायचे कुणाला संशय येवू नये म्हणून लोकाचा खून करायचे आणि हाताला लागेल तो माल घेऊन पसार व्हायचे. 1976 सालच्या पुण्याचा हिवाळा अंगावर केवळ थंडीने नव्हे भीतीनेही शहारे आणत होता. संध्याकाळ नंतर पेशवे पार्क, सारस बाग, लकडी पूल, तुळशीबाग, पेठांमधले रस्ते निर्मनुष्य झाले होते.
शेवटचा खुन:
दिवस होता २३ मार्च १९७७. जयंत गोखले हा त्याच टोळीतील एकाचा मित्र होता. अभिनव कॉलेजचा विद्यार्थी आणि या गँगचा सीनिअर. टोळीतील एकाला गोखलेने बरीच मदत केली होती. गोखलेचे वडील अलका टॉकीजशी सिनेमांच्या वितरणासंदर्भात संबंधित असल्याची त्यातील एकाला माहिती होती. त्यांनी गोखले कुटुंबीयांकडे पुढचं सावज हेरण्यासाठी मोर्चा वळवला. ते गोखलेंच्या घरी गेले त्यावेळी जयंत घरी नव्हता. नंतर येतो म्हणून ते निघाले.जयंतचा धाकटा भाऊ अनिल गोखले घरी होता. तोही या चौघांच्या ओळखीचा. अलका टॉकीजपर्यंत सोडतोस का? असं अनिलने विचारलं आणि तो जक्कल बरोबर घरातून नि घाला. या नराधमांनी अनिल गोखलेचाही तसाच नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बंडगार्डनला घेऊन गेले. तिथे एका शिडीला बांधून अनिलचा मृतदेह रात्री नदीत सोडून देण्यात आला. तो प्रवाहाबरोबर वाहत जाईल, असा त्यांचा अंदाज होता, पण त्यांचा अंदाज चुकला. आदल्या रात्री मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना चौघांचा हा उद्योग नेमका एका मद्यपीने पाहिला. चौघे पसार झाल्यावर त्याने पाण्यात सोडलेली वस्तू काय ते पाहण्यासाठी त्याने पोतं उचकवलं तर त्यात मृतदेह दिसला आणि तो घाबरला तो जवळच्या बंडगार्डन पोलीस चौकीत गेला. तिथे पोलिसांना काय घडलं ते सांगू लागला, पण त्यात दारू प्यायल्याने त्याला धड बोलताही येत नव्हतं अशी अवस्था पाहून त्याला पोलीसांनी लॉकअपमध्ये बंद केलं.

खुनाच्या मालिकेचा उलगडा:
पोलिसांना या प्रकरणाबद्दल समजल की, हे खून होण्यामागे मूळ हेतू खुनाचा नसून लूटमारीचा आहे. आणि हे एक सिरीयल किलिगंचं प्रकरण आहे. दरवेळेस खनू झालेल्या ठिकाणी सर्व तिजोऱ्या, कपाटं उघडे दिसायचे सामानाची नासधूस झालेली दिसायची, पैसे दागिने गायब झालेले दिसायचे त्यामुळे पूर्ण खात्रीशीर हे प्रकरण चोरीचे आहे. खून झालेल्या ठिकाणी दरवेळेस विशिष्ट अत्तराचा सुगंध पसरलेला होता. का? तर पोलिसांच्या श्र्वानाला गंध ओळखता येऊ नये म्हणून. याचा अर्थ हे सगळे खून आधीच रचलेले होते. आणि या कटाचा सूत्रधार थंड डोक्याचा असावा. कारण इतक्या सफाईदारपणे योजना आखणे सोपे नाही. शिवाय खून करण्यासाठी कुठल्याच हत्यारांचा वापर केला नव्हता. जास्तीत जास्त खून हे नायलॉनच्या दोरीने केले गेले होते.
दुसऱ्या दिवशी अनिल गोखले परतला नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. मदत करण्याच्या बहाण्याने आणि कालचा प्लॅन किती यशस्वी झाला याची चाचपणी करायला हि टोळी थेट बंडगार्डन पोलीस ठाण्यात गेली. “आमचा मित्र गायब झालाय, तुम्ही काहीच कसा शोध घेत नाही”, म्हणून पोलिसांशीच हुज्जत घालू लागले. असं केल्याने आपल्यावर अजिबातच संशय येणार नाही, याची त्यांना खात्री होती. पण त्या लॉकअपमधल्या मद्यपीनेत्या टोळीला ओळखलं, तो पोलि सांना तसं सांगूलागताच पोलिसांनीही थोडं गांभीर्याने प्रकरण घेतलं. २४ मार्चला अनिलचा मृतदेह बंडगार्डनलाच सापडला. तेव्हा संशय बळावला आणि त्या टोळीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं पोलिसांनी प्रत्येकाची स्वतंत्र चौकशी केली आणि त्या चौकशी दरम्यान एक जन फुटला, तो होता “सुहास चांडक”. सर्वांना कैदेत टाकल्यावर ह्याने घाबरून सगळा कबुली जबाब देण्याचं मान्य केलं. आणि तो झाला माफीचा साक्षीदार. पुढे जाऊन सुहास चांडक ने सगळं प्रकरण सांगितलं, आणि या प्रकरणात पोलिसांना एक नवीन माहिती (twist) मिळाली, ती म्हणजे एकूण ९ खून नाही तर प्रत्यक्षात १० खून झाले होते.

पहिल्या खूनाचा उलगडा:
या टोळीने पहिला खून त्यांचाच मित्र प्रकाश हेगडे, हॉटेल “विश्व” चे मालक सुरेश हेगडे यांच्या मुलाचा केला होता. हे सगळेजण होते पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयाचे विद्यार्थी. त्याच कॉलेजच्या बाजूला होतं “विश्व हॉटेल” याच हॉटेलात हे सगळेजण, राजेंद्र जक्कल, शांताराम जगताप, सुहास चांडक, मुनव्वर शहा, दिलीप सुतार आणि प्रकाश हेगडे हे नेहमी बसायचे. आणि यांना नशा करायचा मोठा नाद होता. विडी, सिगारेट, दारू हे सगळं त्यांना नित्याचंच होतं. शिवाय ते अमली पदार्थ सुद्धा सेवन करत असत. टेबलावर कागद ठेऊन त्यावर विचित्र दिसणारा एक हिरवा गोळा ठेवायचे आणि सगळेजण त्यातला एक एक घास खात. आणि कित्येक वेळ तरी त्याच जागेवर स्तब्ध बसून राहत असत. हीच नशा करण्यासाठी त्यांना पैसे कमी पडू लागले. आणि नशा केल्याशिवाय राहाणेसुद्धा शक्य नव्हते. त्यासाठी हवे होते पैसे. ते जर नेहमीच्या मार्गाने मिळवले तर हवे तेवढे कधीच मिळणार नाहीत हे त्यांना उमगले. मग त्यांनी योजना आखली. कुणाचंतरी अपहरण करून त्याच्या घरच्यांना पैसे मागायचे. तेव्हा त्यांचा सोबती प्रकाश त्यांना म्हणाला, अरे कुणाला शोधता कशाला, माझ्या वडिलांकडे खूप पैसे आहेत. मी मागतो तर ते देत नाहीत कधीच, तुम्ही असं करा मी कीडनॅप झालोय असं सांगून त्यांनाच पैसे मागा. म्हणजे तुम्हाला सुद्धा पसै मिळतील आणि मला सुद्धा मिळतील, अस त्याचं ठरल. रीतसर चिठ्ठ्या लिहून अण्णा हेगडे यांना
धमकवण्यात आलं आणि 25 हजारांची मागणी करण्यात आली. प्रकाशला गायब करून त्याच्याच कॉलेजमधली ही मुलं चहा प्यायला, नाश्ता करायला हॉटेलमध्येच येत राहिली. कसे आणि कुठे पैसे द्यायचे हे सांगणारी चिठ्ठी विश्व हॉटेलच्या एका टेबलाखालीच चिकटवली गेली. सारसबाग-पेशवेपार्क परिसरातल्या एका झाडावर पिशवी ठेवायला सांगितली. पण खंडणीखोरांनी धमकावून देखील हेगडे यांनी पोलिसांना कळवलं. जक्कल गँगला अर्थातच याचा सुगावा लागला. मग खंडणीचे पैसे उचलण्यात मोठा धोका होता. कारण पोलिसांनी सापळा रचला होता.
जक्कल गँगने आपल्या मित्रालाच-प्रकाशलाच संपवण्याचा डाव रचला. त्याला कोथरूडच्या एका टपरीवर नेऊन ठेवलं होतं. ही टपरीसुद्धा या गँगचा अड्डा होता. तिथून प्रकाश हेगडेला सारसबाग परिसरात आणलं गेलं. जक्कल, सुतार, जगताप आणि चांडक यांनी 15 जानेवारी 1976 च्या थंड रात्री दारूपार्टीच्या नावाने हेगडेला भरपूर दारू पाजली आणि तिथेच नायलॉनच्या दोरीने गाठ मारून त्याचा गळा आवळून खून केला. पेशवेपार्कच्या तलावात जक्कल गँगने पूर्वनियोजित प्लॅननुसार एका लाकडी पिंपात हेगडचे मृत देह घालनू सोडून दिला, त्या काळात या तलावाची विशेष देखभाल होत नसे आणि गाळही काढला जात नसे, हे या गँगला चांगलं माहीत होत.भोकं असलेल्या लाकडी पिंपातला मृतदेह तळ्यातले मासे खाऊन टाकतील आणि त्याची आपोआप विल्हेवाट लागेल, असा त्यांचा तर्क होता. खरोखरच प्रकाश हेगडेचा मृतदेह पुढे जवळपास वर्षभर सापडलाच नाही. सुहास चांडकने पोलिसांना हे ही सांगितलंकि, जोशी-अभ्यंकर खुनानंतर अनिल गोखले याला आपण केलेल्या कृत्यांबद्दल वाईट वाटू लागलं. तो जेव्हा त्यांना म्हणाला की मला तुमच्यात नाही राहायचं मी वेगळा होतो आहे. तेव्हा पुढे जाऊन हा पोलिसांना आपल्याबद्दल सांगू शकतो. म्हणून याचाही काटा काढायचा असं ठरलं. तेव्हा अनिलला सुद्धा मारून त्याचा मृतदेह बंडगार्डन तलावात फेकून दिला. शेवटी अशी सगळी हकीगत पोलिसांसमोर आली.
क्रौर्याचा सुत्रधार:

या टोळीचा सर्वात मोठा मास्टरमाईंड होता राजेंद्र जक्कल. राजेंद्र मध्यमवर्गी य कुटुंबातून होता. त्याचे वडील फोटोग्राफी करत. त्यांचा स्वतःचा एक फोटो स्टुडिओ देखील होता. “स्वस्तिक फोटोस्टुडीओ”. राजेंद्र खूप गूढ स्वभावाचा होता. आणि त्याच्या या अशा स्वभावाला कारणीभूत होतं त्याचं कुटुंब. त्याला एक मोठा भाऊ होता. त्याच्या आईकडून त्याला नेहमी हीन दर्जा ची वागणूक मिळत होती. त्याचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईच्या संपूर्ण शरीरावर मोठमोठे फोड आले होते. ज्यामुळे ति चंसगळंसौंदर्य मिटून गेलंहोतं. त्यामुळेच आईला त्याच्याबद्दल चीड होती. शिवाय त्याच्या वडिलांनी त्याच्या भावाला दहावी नापास झाला म्हणून घरातल्या लाकडी बेंचवर उभा करून त्याच्या पायात खिळे ठोकले होते. पुढे त्याचा भाऊ दारू पिऊ लागला आणि त्यातच मरण पावला. हे असे सगळे अमानुष प्रकार त्याने बघितलेच नाही तर प्रत्यक्ष अनुभवले होते त्यामुळे त्याचा स्वभाव देखील तसाच गूढ झाला होता. एकदा त्याने त्यांच्या कट्ट्यावर घोरपड आणली आणि तिच्या डोक्याजवळ वार केला आणि तिचं तडफडणं बघत बसला. कोंबडीला जखमी करून तिला तडफडत ठेवायचा. मरू द्यायचा नाही. तिचा आकांत, तडफड तो ‘एंजॉय’ करायचा. यातुन त्याची विकृत अमानवी मानसिकता दिसून आली होती.
मुनव्वर शाहने तुरुंगात असतांना त्याचं आत्मचरित्र लिहिलं. ते “येस आय ॲम गिल्टी” नावाने प्रसिद्ध झालं. यातूनही जक्कलच्या विकृत प्रभावाखाली कशी कृत्य करत गेलो, याचं वर्णन मुनव्वरने लिहिलं आहे. पकडलं गेल्यापासून मुनव्वर देवा-धर्माचं करायला लागला होता. त्याला कुराणाचं भाषांतर करायचं होतं.

सुनावणी आणि चौघांना फाशी:
त्यानंतर पुढची सहा वर्षे हा खटला चालला. हा खटला ऐकण्यासाठी न्यायालयात होणारी गर्दी ही देखील अभूतपूर्व होती. आणि हेप्रकरण कोर्टात गेलं. त्यांच्यावर खटला दाखल झाला. माफीचा साक्षीदार झाल्याने सुहास चांडकला फक्त शिक्षा झाली. आणि बाकी चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली. सेशन कोर्टात न्यायाधीश वा. ना. बापट यांनी २८ सप्टेंबर १९८३ साली फाशी जाहीर केली. पुन्हा त्यांनी दया याचिका सादर केली. पण सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली आणि अखेरीस ती शिक्षा कायम राहून २७ नोव्हेंबर १९८३ रोजी चौघांना पुण्यातल्या येरवडा तुरुंगात फाशी दिली गेली.
या प्रकरणावर १९८६ साली नाना पाटेकर यांचा “माफीचा साक्षीदार” या नावाने सिनेमा देखील आला होता.

या चौघांनी हे नक्की का केले, त्यांची मानसिकता काय होती? हे आजही कुणाला पुरेसे कळलेले नाही. कला महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारे हे चार-पाच युवक इतक्या सगळ्यांचा जीव घेण्याइतके क्रूर का झाले? याचेही उत्तर मिळालेले नाही. फक्त पैशासाठी हे सगळे केले असे म्हणावे, तर त्या सगळ्यांमधील क्रौर्याचे काय? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. एकंदरीत या प्रकरणात माणसाच्या रूपातील हिंस्त्र जनावर आपल्याला दिसून आले.
