प्रस्तावना
महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा आणि वैभवशाली समृद्ध पार्श्वभूमी लाभली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला सिंहगड किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक ठेवा आहे. पूर्वी ‘कोंढाणा’ या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाचा साक्षीदार आहे. इ.स. १६७० मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणांची आहुती देऊन हा किल्ला जिंकला. त्यांच्या अतुलनीय शौर्यामुळे या किल्ल्याला ‘सिंहगड’ हे नाव प्राप्त झाले. किल्ल्याचे भौगोलिक स्थान, ऐतिहासिक लढाया, स्थापत्यकला, संरक्षण व्यवस्था आणि सांस्कृतिक महत्त्व यांमुळे सिंहगडाचे स्थान विशेष आहे. सिंहगड हा केवळ दगड-मातीचा दुर्ग नसून महाराष्ट्राच्या शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्यनिष्ठेचे प्रतीक आहे.
भौगोलिक माहिती :-
ऐतिहासिक पुणे शहराच्या नैऋत्येला साधारण पंचवीस किलोमीटर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे. सह्याद्री पर्वत रांगेच्या पूर्व भागात भुलेश्वराच्या पर्वत रांगेवर हा गड स्थित आहे. पुणे शहरापासून नजीकच्या अंतरावर असल्याने पुण्यातून कुठूनही लक्ष वेधतो. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात व डोणजे गावाजवळ हा किल्ला भक्कमपणे उभा आहे. या किल्ल्याची चढाई मध्यम प्रकारात येते. हा किल्ला मुरुंबदेव डोंगरावर असल्याने किल्ला गिरीदुर्ग या प्रकारात येतो.
प्राचीन इतिहास :-
स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार, पूर्वीच्या काळी कौडण्य ऋषीनी या किल्ल्यावर तपश्चर्या केली होती. त्यामुळे ऋषींच्या नावावरून या किल्ल्याला ‘कोंढाणा’ नाव पडले. तेथील स्थानिक महादेव कोळी लोकांचा राजा ‘नागनाथ नाईक’ यांच्या ताब्यात हा गड होता. पूर्वीच्या काळी हा गड आदिलशाहीच्या ताब्यात होता ‘दादाजी मालवणकर’ हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते इ. स. 1647 मध्ये त्यांनी गडावर लष्करी केंद्र बनवले. त्याच सोबत किल्ल्यावरील पाण्याची टाकी, मुख्य दरवाजे, रस्ते, बुरुज यांची डागडूजी केली. सन 1328 मध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलक यांनी कोंढाणा किल्ला जिंकला. सन 1347 नंतर दख्खन मध्ये बहमनी राज्य स्थापन झाले आणि किल्ला त्याच्याकडे गेला मात्र 15 व्या शतकाच्या अखेरीस बहमनी राज्य समाप्त झाल्यानंतर कोंढाणा किल्ला अहमदनगरच्या निजामशाही कडे गेला. सन 1665 मध्ये (11 जून 1665) मिर्झाराजे जयसिंग यांनी पुरंदरला वेढा घातला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला 23 किल्ले मोघलांना दिले त्यामध्ये कोंढाणा (सिंहगड) किल्ल्याचा पण समावेश होता. सन 1647 मध्ये शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला प्रामुख्याने मुसधगिरीने स्वराज्यात आणला. शिवाजी महाराज तेव्हा सुमारे 17 वर्षाचे होते. तोरणा किल्ला घेतल्यानंतर आसपासचे किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात केली तेव्हा किल्लेदार सिद्धी अंबरला आपल्या बाजूला वळवून कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्यात आला म. सन 1648 मध्ये आदिलशहाने शहाजी राजांना जिंजी (कर्नाटक) येथे अटक केली. शिवाजी महाराजांनी पुणे परिसरातील किल्ले ताब्यात घेतल्यामुळे आदिलशहा नाराज होता. म्हणून त्याने शहाजीराजांना कैद केले. शिवाजी महाराजांनी न थेट लढाई टाळून मुघल बादशहा शहाजहान याच्याशी संपर्क साधला आणि मुघलां र्मार्फत आदिलशहावर दबाव आणला. सन 1649 ला शहाजीराजांची सुटका झाली या तडजोडीत कोंढाणा किल्ला आदिलशहाला परत द्यावा लागला तसेच शहाजीराजांना बंगळूर प्रांतावरील हक्क सोडावे लागले. यामुळे आदिलशाहीशी थेट संघर्ष टाळला गेला त्यानंतर स्वराज्याची तयारी जोरात सुरू राहिली. सन 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी मराठ्यांचे अनेक किल्ले घेतले, त्यात सिंहगड ही मुघलांच्या ताब्यात गेला. 1693 मध्ये सिंहगड किल्ला परत मराठ्यांनी जिंकला यात सरदार बलकवडे आणि शंकरजी नारायण सचिव यांचा पुढाकार होता मात्र या लढाईत सरदार बलकवडे यांना वीरमरण प्राप्त झाले. सन 1703 मध्ये औरंगजेबाने स्वतः पुण्याच्या परिसरात तळ ठोकून सिंहगडाला वेडा घातला आणि किल्ला जिंकलाल तेव्हा औरंगजेबाने किल्ल्याचे नाव ‘बक्षिंदाबक्ष’ ठेवले होते. सन 1706 मध्ये मराठ्यांनी सिंहगड पुन्हा जिंकला या मोहिमेचे नेतृत्व सरदार शंकरजी नारायण सचिव करत होते. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात (1817 ते 1818) पेशवे बाजीराव दुसरे यांचा नोव्हेंबर 1817 मध्ये खडकीच्या लढाईत पराभव झाला. इंग्रजांनी पुणे ताब्यात घेतले पण पेशव्यांचे आसपासचे किल्ले अजून मराठ्यांकडे होते. मात्र ब्रिगेडियर जनरल प्रिझलर यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेने सिंहगडाला वेढा घातला. किल्ल्याचे कडे आणि तटबंदी मजबूत असल्याने सुरुवातीला हल्ला अवघड ठरला म्हणून इंग्रजांनी तोफखाना चढवून किल्ल्यावर मारा केला. तोफांच्या माऱ्यामुळे किल्ल्यातील मराठा सैन्याला टिकाव धरता आला नाही. 2 मार्च 1818 ला मराठ्यांनी शरणागती पत्कारली आणि किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
ऐतिहासिक लढाई
4 फेब्रुवारी 1670 रोजी या गडावर ऐतिहासिक लढाई झाली. शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्तारावरील लक्ष व आदिलशाही, निजामशाही व मराठा साम्राज्य यांच्या नजीक असल्याने या गडाचे राजकीय महत्त्व वाढत चालले होते ‘राजमाता जिजाऊ’ यांनी हे बोलून दाखवताच ‘सुभेदार तानाजी मालुसरे ‘ यांनी हा गड स्वराज्यात आणण्याचा विडा उचलला. तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा याचे लग्न पाच-सहा दिवसावर येऊन ठेपले होते मात्र त्याच वेळी कोंढाणा किल्ला जिंकण्याची मोहीम असल्यामुळे तानाजी मोहिमेसाठी निघाले त्यावेळी त्यांनी “आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं ! ” असे उद्गगार काढले. यावरून त्यांची स्वराज्य निष्ठा लक्षात येते. गडाच्या पश्चिम बाजूला ‘द्रोणगिरी’ कडा होता. कडा अत्यंत कठीण व उंच, तीव्र असल्याने त्या बाजूला रात्रीच्या वेळी पहारा खूप कमी असायचा. तानाजी मालुसरे व त्यांच्या मावळ्यांनी ‘यशवंती’ नावाच्या घोरपडीच्या मदतीने हा द्रोणगिरी कडा सर केला आणि रात्रीच्या वेळी मावळ्यांसह गडावर प्रवेश केला. गड्यावर ‘उदयभान राठोड’ हा प्रमुख होता. त्यास मराठा मावळे गडावर असल्याची खबर मिळतच तोही तलवार घेऊन लढण्यास निघाला. गडावर रात्रीच्या वेळी लढावी सुरू झाली लढताना उदयभान राठोड व तानाजी मालुसरे यांची लढाई सुरू झाली. तानाजी मालुसरे यांची ढाल तुटली, त्यांनी हाताला फडके बांधून हाताची ढाल केली. लढाईत दोघेही मरण पावले. तानाजी पडल्याचे समजल्यानंतर मावळ्यांनी चा धीर सुटला व ते मागे फिरू लागले. त्यावेळी मावळ्यांना लढण्यास प्रवृत्त करण्यास तानाजींचा धाकटा भाऊ ‘सूर्याजी मालुसरे ‘ पुढे सरसावला. सूर्याजी म्हणाले, “गडावरून उतरण्याचे दोन मी कापून टाकले आहेत. त्यामुळे एकतर शत्रूशी लढून मरा नाहीतर गडावरून उड्या टाकून मरा.” त्यामुळे पुन्हा एकदा मावळ्यांनी ‘हरहर महादेव’ गर्जना करत लढाई सुरू केली. घनघोर लढाईनंतर मावळ्यांनी गड काबीज केला. शिवाजी महाराजांना आणि जिजाऊ मासाहेबांना राजधानी रायगडावर कोंढाणा जिंकल्याची व तानाजी धारातीर्थी पडल्याची बातमी कळतात महाराजांनी ‘गड आला, पण सिंह गेला’ असे उद्गार काढले. मग वैद्य नवमी रोजी हे ऐतिहासिक युद्ध पार पडले.
किल्ल्यावरील ठिकाणे
1) पुणे दरवाजा :-
खडकवासला धरणाच्या शेजारून,पुणे शहराच्या बाजूने या दरवाजातून गडावर प्रवेश करत येतो. पुणे शहराच्या बाजूने हा दरवाजा असल्याने ‘पुणे दरवाजा’ असे नाव पडले. हा दरवाजा गडाचा मुख्यद्वार आहे. याचे बांधकाम भक्कम दगड व चुन्याच्या खंदक वापरून केले आहे.

2)कल्याण दरवाजा :-
गडाच्या पश्चिम दिशेला हा दरवाजा आहे. कोंढणपूर वरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. पायथ्याच्या कल्याण गावावरून या दरवाज्यास ‘कल्याण द्वार’ असे नाव पडले. शत्रूच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यास दरवाजास लागून मोठे बुरुज उभारले आहेत.

3) सुभेदार तानाजींचे स्मारक :-
अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर ‘सुभेदार तानाजी मालुसरे ‘ यांचे स्मारक आहे. किल्ला मुघलांकडून परत मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राण्यांच आहुती दिली.


4) उदयभान राठोड चे स्मारक :-
दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर आल्यावर येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदयभान राठोड चे स्मारक चिन्ह म्हणून ओळखले जाते. तानाजी मालुसरे व उदयभान राठोड यांच्यात घनघोर लढाई झाली होती. या लढाई वेळी मुघलांतर्फे ‘उदयभान’ हे किल्लेदार होते.

5)छत्रपती राजाराम महाराज स्मारक :-
राजस्थानी पद्धतीचे रंगीत देवळासारखी जी घुमटे दिसते तीच राजाराम महाराजांची समाधी होय. मोगल फौजेला सतत अकरा वर्ष टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी शनिवार दिनांक 3 मार्च 1700 या दिवशी सिंहगडावर निधन झाले.

6) दारूचे कोठार :-
दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारूचे कोठार आहे. दिनांक ११ सप्टेंबर 1751 मध्ये या कोठारावर वीज पडली. या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

7) देवटाके :-
तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यात येते तेव्हा ह्या टाक्याचे पाणी पिण्यासाठी मागवत असत.

8) झुंजार बुरुज :-
हे सिंहगडाचे दक्षिण टोक होय. उदयभानच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपी सारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात. तर खाली पानशेतचे खोरे दिसते येथून पूर्वेच्या बाजूला लांबवर पुरंदर किल्ला दिसतो.

9) कडेलोट कडा :-
दोषींना शिक्षा देताना, मोठा गुन्हा केल्यास येथून ढकलले जात असे. म्हणून ‘कडेलोट कडा’ असे नाव पडले. यास ‘तानाजी कडा’ असेही म्हटले जाते. झुंजार बुरुजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने या कड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिम दिशेला आहे. येथूनच तानाजी मालुसरे मावळ्यांसह वर चढले होते.

10) श्री अमृतेश्वर भैरव मंदिर :-
कोंढाणेश्वराच्या मंदिरापासून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. स्थानिक महादेव कोळी लोकांनीच मंदिर बांधले आहे. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती आहेत. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.

11) कोंढाणेश्वर मंदिर :-
भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरात प्राचीन शिवलिंग आहे. यादव राजांचे हे कुलदैवत होते व त्यांच्याकडे हा गड होता त्यावेळी त्यांनीच मंदिर बांधले आहे.

12) टिळक बंगला :-
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निवासस्थान याच किल्ल्यावर होते. गांधीजी आणि लोकमान्य टिळक यांची भेट याच किल्ल्यावर झाली होती. लोकमान्य टिळकांनी हे निवासस्थान रामलाल नाईक यांच्याकडून विकत घेतले होते. त्यांनी या बंगल्यावरती काही ग्रंथ सुद्धा लिहिले आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळात टिळक इथे गुप्त बैठका घेत असत.

13) मोरदरीची तोफ :-
किल्ल्याच्या पायथ्याशी आढळलेली एक अत्यंत ऐतिहासिक आणि प्राचीन तोफ आहे. 1981 मध्ये खालील मोरदरी गावातील ग्रामस्थांनाही तोफ सापडली या तोफेची लांबी साधारणतः दोन मीटर आणि तिच्या तोंडाचा व्यास 23 सेंटीमीटर आहे. या तोफे च्या मागील बाजूस गुंफाकृती रचना पाहायला मिळते.

निष्कर्ष :-
डोंगरावरील किल्ल्यांवर थेट हल्ला करणे कठीण असते त्यामुळे नैसर्गिक रचनेचा संरक्षणासाठी फायदा होत असे. पुणे शहर आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशावर प्रभाव ठेवण्यासाठी सिंहगड सारख्या किल्ल्यावर नियंत्रण उपयुक्त होते. किल्ल्याच्या उंच स्थानामुळे आसपासच्या प्रदेशातील व शत्रूंच्या हालचालींचे निरीक्षण करता येत असे. स्वराज्याच्या संरक्षण व्यवस्थेला बळ मिळत होते. आदिलशाही, निजामशाही, मुघल यांच्या वर लक्ष ठेवण्यास या गडाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. पुढे पेशव्यांच्या काळात पुणे हे मराठा सत्तेचे केंद्र बनले. त्यामुळे पुण्याच्या परिसरातील किल्ल्यांना विशेष महत्त्व होते. सिंहगड किल्ला सध्या वनविभाग पुणे या वनक्षेत्रात येत असल्याने गस्त, सुरक्षा आणि सुविधांची जबाबदारी मुख्यत वन विभागाकडे आहे. वन विभाग आणि स्थानिक गावकऱ्यांनी मिळून स्थापन केलेली ‘घेरा सिंहगड वनसंरक्षण समिती’ किल्ल्याची देखभाल करते. वाहन धारकांकडून घेतलेले शुल्क या समितीच्या खात्यात जमा होते आणि त्यातून पायवाटा, पाण्याचे स्त्रोत, स्वच्छता आणि जैवविविधता यांवर खर्च होतो.

Travel and adventure
